वाणगाव स्थानकात आधुनिक सिग्नल यंत्रणा
ठाणे: विरार-डहाणू रोड रेल्वेमार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) वाणगाव स्थानकात आधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय) आणि स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित केली.
वाणगाव स्थानकाच्या यार्डमध्ये नव्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेद्वारे ११ सिग्नल, १४ पॉइंट आणि ३० ट्रॅक सेक्शन कार्यान्वित करण्यात आले. याशिवाय ३६ नवीन मार्गांची भर पडली असून, यापूर्वीचे २५ मार्गही अस्तित्वात आहेत. फ्रॉशर सेन्सर टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या मल्टी-सेक्शन डिजिटल ॲक्सल काउंटर (एमएसडीएसी) यंत्रणेतील ६० डिटेक्शन पॉइंटही कार्यान्वित करण्यात आले आहेत.
बोईसर-वाणगाव स्वयंचलित सिग्नलिंग विभागातील रिले हट क्रमांक ७ आणि ८ येथेही नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू करण्यात आली. या ठिकाणी ११ सिग्नल आणि दुहेरी तपासणी व्यवस्था असलेले २२ ट्रॅक सेक्शन कार्यान्वित करण्यात आले. तसेच १० नवीन मार्ग सुरू करण्यात आले असून, फ्रॉशर कंपनीच्या एफएडीएसी तंत्रज्ञानावर आधारित ट्रॅक डिटेक्शन यंत्रणा बसविण्यात आली. नवीन यंत्रणेमुळे सिग्नलिंगची कामे अधिक केंद्रीकृत आणि कार्यक्षम पद्धतीने हाताळता येणार आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या हालचालींचे व्यवस्थापन अधिक विश्वासार्ह होण्यास मदत होईल, असा दावा एमआरव्हीसीने केला.
पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होणे हा विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आहे. या कामामुळे वाणगाव स्थानक आणि यार्डच्या चौपदरीकरणाशी संबंधित पुढील कामे हाती घेता येतील. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी वाहतूक हाताळण्यासाठी रेल्वे पायाभूत सुविधांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले.