जिल्हा

सहा जंक्शनवर आधुनिक सिग्नल यंत्रणा बसवणार

सहा जंक्शनवर आधुनिक सिग्नल यंत्रणा बसवणार
सहा जंक्शनवर आधुनिक सिग्नल यंत्रणा बसवणार फोटो: ठाणे वैभव

घोडबंदरची कोंडी फुटणार 

ठाणे: बारमाही वाहतूक कोंडीने त्रस्त असणाऱ्या घोडबंदर मार्गाची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. येथील सेवा रस्ता देखील मुख्य मार्गात जोडल्याने हा रस्ता प्रशस्त झाला आहे. त्याच जोडीने आता या मार्गावरील सहा जंक्शनवर आधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याने ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मुख्य रस्ता आणि सेवा रस्ते एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे. या बदलामुळे रस्त्याची रुंदी वाढली असून, काही ठिकाणी रस्त्याची सुरुवात आणि शेवटची रचना बदलली आहे. मात्र, रस्त्याच्या नव्या रचनेच्या तुलनेत पूर्वीपासून असलेली सिग्नल यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. कमी उंचीचे सिग्नल दूरवरून स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना चौकात पोहोचेपर्यंत सिग्नलची स्थिती लक्षात येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच सिग्नल यंत्रणेतही बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणून ठाणे महापालिकेने सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्याचे नियोजन केले आहे.

प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन स्तरांवर सिग्नलची मांडणी केल्यामुळे चौकापासून दूर असलेल्या वाहनचालकांनाही सिग्नलची स्थिती स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल. मात्र ही अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी ठाणे महापालिकेला ठेकेदाराच मिळत नव्हता. सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी महापालिकेने तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवली. पहिल्या प्रयत्नात दोन कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने त्यांच्या निविदा बाद झाल्या. दुसऱ्या प्रयत्नात एकच निविदा प्राप्त झाली. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. त्यात दोन कंपन्यांनी सहभाग घेतला.

ट्रॅफिकटेक सोल्युशन प्रा. लि. या कंपनीने अंदाजित खर्चापेक्षा ०.९४ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली. तर एसओएमएस ट्रॅफिक सिस्टिम्स लि. या कंपनीने अंदाजित खर्चापेक्षा ०.२५ टक्के अधिक दर दिला. त्यामुळे ट्रॅफिकटेक सोल्युशन कंपनीची निवड करण्यात आली आहे. 

या कामासाठी वस्तू व सेवा करासह सुमारे तीन कोटी चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च ‘डिपॉझिट वर्क’अंतर्गत केला जाणार आहे. आयुक्तांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने हा प्रस्ताव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

पातलीपाडा जंक्शन, विजय गार्डनजवळील डी-मार्ट परिसर, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली जंक्शन, ओवळा जंक्शन आणि नागलाबंदर जंक्शन या सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुधारण्यात येणार आहे. सध्या सिग्नल असलेल्या ठिकाणीच ही व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

घोडबंदर मार्गावरील ज्या चौकांची कामे पूर्ण झाली आहेत, तेथे प्रथम सिग्नल यंत्रणा सुधारण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित जंक्शनवर टप्प्याटप्प्याने काम केले जाईल. सिग्नलची जागा, आराखडा वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार आता या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभांगी केशवानी यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475