ठाणे: स्पेनमधील 'कॉनकुर इंटरनॅशनल्स २०२६' स्पर्धेत ठाण्यातील १६ महिला-पुरुष गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा मानवी मनोरे बांधण्याच्या कलेतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेत नऊ पैकी नऊ थरांचा मनोरा रचत कॅस्टेलर्स विला फ्रांका या संघाने बाजी मारली.
प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक आणि महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने स्पेनमधील 'तारागोना' येथे प्रसिद्ध 'कॉनकुर फेस्टिवल'ला भेट दिली. स्पेनमध्ये साजरा होणारा हा उत्सव आपल्या महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाशी सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आहे आणि यामध्ये मानवी मनोरे सादर करण्यात येतात. यंदाच्या वर्षी यामध्ये ४२ संघांनी सहभाग घेतला.
यावेळी, महाराष्ट्राच्या संघाला 'कॅस्टेलर्स विला फ्रांका' या जगातील सर्वात यशस्वी मानवी मनोरे बांधणाऱ्या संघासोबत सहयोग करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात दोन्ही संघांनी एकत्रित मनोरे बांधण्याचा सराव केला व एकमेकांच्या मानवी मनोरे उभारणाच्या कौशल्याचे आदान-प्रदान केले. आपल्या पारंपरिक दहीहंडी खेळाला जागतिक व्यासपीठावर नेता आले याचे अत्यंत समाधान आहे.
ठाणे शहरातून १६ महिला-पुरुष गोविंदा पथकांच्या माध्यमातून ८३ गोविंदांनी सहभाग घेतला. पथकांमध्ये सहयोग, ठाण्याचा राजा, खोपटचा राजा, रामनगर गोविंदा पथक, शिवतेज महिला गोविंदा पथक आणि संकल्प महिला गोविंदा पथक आदी पथकांचा समावेश होता.
या संपूर्ण दौऱ्याचे आयोजन आणि व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, बाळा पडेलकर आणि गीता झगडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या पार पडले. त्यांच्या अथ्थक प्रयत्नांमुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सशक्त प्रतिनिधित्व करण्यास यश मिळाले.