महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तनाचा आरोप
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावर कार्यरत उप स्टेशन व्यवस्थापक आशुतोष कुमार यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही योग्य कारवाई न झाल्याने संबंधित महिला कर्मचाऱ्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) रेल्वे युनिटकडे धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला कर्मचाऱ्याची तक्रार मनसे रेल्वे युनिटचे पदाधिकारी प्रथमेश म्हात्रे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी आशुतोष कुमार यांना संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या समक्ष बोलावून कथित अश्लील संदेश पाठविल्याबाबत तसेच महिलेला आपल्या घरी येण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या आरोपांबाबत जाब विचारला. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी आशुतोष कुमार यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येते.
घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करून आशुतोष कुमार यांची मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आणि त्यांना जीआरपी पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, तक्रारदार महिला कर्मचारीही मनसे कार्यकर्त्यांसोबत जीआरपी पोलीस ठाण्यात पोहोचली. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे जीआरपीने आशुतोष कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.