* धरणातील पाणीसाठा वेगाने घसरणार
* ठाण्यासह राज्यातील इतर शहरांवर पाणी कपातीचे संकट
ठाणे: अल निनोचे संकट गहिरे होत असून त्याचा प्रभाव बाष्पीभवनावर होणार आहे. कडक उन्हामुळे वेगाने बाष्पीभवन होणार असल्याने धरणांतील पाणीसाठाही वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पाणीटंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. हे संकट अधिक तीव्र होऊ नये यासाठी आतापासूनच पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दसऱ्यानंतर ठाणे शहरासह राज्यातील अन्य शहरांत १० टक्के पाणीकपात घोषित करण्यात आली आहे.
राज्यात पाऊस कमी पडल्याने १६ ऑक्टोबरपासून ठाणे महापालिकेसह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १०टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली असून ठाणे महापालिकेने भातसा धरणातून ११ महिन्यांसाठी एक लाख ९५,८०० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे, परंतु अल निनोच्या प्रभावामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जलसिंचन विभागाने आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करणे सुरु केले आहे. राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून राज्यात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्याकरिता प्रत्येक महापालिकेला त्यांना पुरवठा होत असलेल्या संस्थांकडे पाण्याची मागणी करण्याच्या सूचना जलसिंचन विभागाने केल्या होत्या. त्यानुसार ठाणे महापालिकेने भातसा धरणातून दरदिवशी २६० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी केली आहे तर इतर संस्था आणि महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून ३०० दशलक्ष लिटर असे एकूण ५६१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दरदिवशी केला जात आहे.
ठाम महापालिकेला एमआयडीसी, मुंबई महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जात असून सर्व संस्थानी १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे, त्यामुळे महापालिकेने भातसा तसेच बारवी विभागाकडे वर्षभर लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची मागणी केली आहे. एमआयडीसी देखिल १५ ऑक्टोबरपासून १०टक्के पाणीकपात करणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेला दिली आहे, परंतु २० तारखेला दसरा असल्याने पाणीकपात दसऱ्यानंतर करावी, अशी विनंती करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल कुळकर्णी यांनी दिली. दरम्यान ठाणेकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.