ठाणे: लोकमान्यनगर-शास्त्रीनगरच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावरून ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विरुद्ध पालिका सभागृहनेते हणमंत जगदाळे यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
लोकमान्यनगर येथील क्लस्टरच्या निमित्ताने हणमंत जगदाळे यांनी रविवारी घेतलेल्या निर्धार मेळाव्यात हजारो नागरिकांची उपस्थिती दाखवत शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटातील ज्येष्ठ नगरसेवकांसह भाजप आणि मनसेच्या नेत्यांचीही एकाच व्यासपीठावर उपस्थिती राहिल्याने या मेळाव्याला केवळ पुनर्विकासाचा नव्हे तर राजकीय शक्तिप्रदर्शनाचा रंग आला.
लोकमान्यनगरातील लक्ष्मी पार्क रोड येथे झालेल्या या मेळाव्यासाठी दुपारपासूनच रहिवाशांचे जथेच्या जथे हातात बॅनर घेऊन दाखल होत होते. परिसरातील मोठ्या गर्दीमुळे जगदाळेंनी आपली स्थानिक संघटनात्मक ताकद दाखवून दिली. मेळाव्यात जगदाळे यांनी नागरिकांना हक्काची अधिकृत घरे मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करताना क्लस्टर पुनर्विकास, डीपी रस्ते आणि रिंग मेट्रो प्रकल्पाला गती देण्याची भूमिका मांडली. मात्र, या मेळाव्यातील राजकीय उपस्थितीने लक्ष वेधून घेतले. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के, कांचन चिंदरकर, सिद्धार्थ ओवळेकर आणि योगेश जानकर, मनोज शिंदे यांच्यासह भाजपचे नगरसेवक अमित सरय्या आणि मनसेचे अविनाश जाधव, रवी मोरे तसेच ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील या मेळाव्याला पक्षीय चौकटीपलीकडचे समर्थन मिळाल्याचे चित्र निर्माण झाले.
लोकमान्यनगरातील रिंग मेट्रोच्या मार्गावरून यापूर्वीच हणमंत जगदाळे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिका वेगळ्या असल्याचे समोर आले आहे. जगदाळे हे रिंग मेट्रोच्या अंमलबजावणीच्या भूमिकेवर ठाम असताना सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली या भागात रिंग मेट्रो आणि डीपी रस्त्याच्या प्रस्तावाला विरोध करणारी सर्वपक्षीय सभा झाली होती. त्यामुळे रविवारी झालेला निर्धार मेळावा हा त्या सभेला राजकीय प्रत्युत्तर म्हणूनही पाहिले जात आहे.
विशेष म्हणजे, जगदाळे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. मात्र, त्याचवेळी सरनाईकांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका लोकमान्यनगरातून आक्रमकपणे मांडण्यात आली. त्यामुळे ठाण्यातील शिंदे यांच्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर नेतृत्व आणि विकासाच्या मुद्द्यांवरून दोन स्वतंत्र राजकीय भूमिका आकार घेत असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले
दरम्यान, मेळाव्यात जगदाळे यांनी पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना विश्वासात घेण्याची भूमिका मांडली. सर्वेक्षण म्हणजे विस्थापन नाही आणि मोजणी म्हणजे तोडकाम नाही, असे सांगत बाधित कुटुंबांची निश्चिती आणि पुनर्वसनाचे नियोजन झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया करण्याचा प्रश्न उपस्थित केला. मात्र, या भूमिकेपेक्षा मेळाव्याला मिळालेली मोठी उपस्थिती आणि विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांची उपस्थिती यामुळे ठाण्यातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने या मेळाव्याची चर्चा अधिक रंगली आहे.
या निर्धार मेळाव्याची सरनाईक समर्थकांनी समाजमाध्यमातून बोचरे तीर मारण्यास सुरवात केली आहे. निर्धार मेळावा की परिसरातील नगरसेवकांच्या विकासाची धडपड असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून खरा विकास येथील रहिवाशांचा नव्हे तर स्थनिक लोकप्रतिनिधींचा होणार असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटणार असल्याचे दिसते.