मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध उग्र आंदोलन
ठाणे: एसआयआरसह नवमतदार नोंदणीसाठीच्या फाॅर्ममधील तरतुदी बदलण्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयावर इतर दोन आयुक्तांनी १४वेळा आक्षेप नोंदवूनही हुकूमशाही पद्धत राबवल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांपैकी दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर तब्बल १४ वेळा लेखी स्वरूपात आपली तीव्र नाराजी आणि आक्षेप नोंदवल्याचे एक वृत्तपत्रातून समोर आल्यानंतर काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. पक्षाने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय ते ठाणे महानगर पालिका मुख्यालयादरम्यान ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात मोर्चा काढला. या मोर्चात ज्ञानेशकुमार यांची वेशभूषा केलेल्या इसमाची गाढवावर बसवून धिंड काढण्यात आली. तर, दोन निवडणूक आयुक्त, सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांची वेशभूषा केलेले दोन जण घोड्यावर स्वार झाले होते. लोकशाही वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांच्या गळ्यात डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की तिन्ही निवडणूक अधिकाऱ्यांना संविधानाने समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे कुठल्याही निर्णयावर दोघे जर एका बाजूला असतील तर बहुमताचा निर्णय मान्य करण्यात यावा. संधू आणि जोशी यांनी १४ आक्षेप घेतलेले आहेत, ते १४ आक्षेप मान्य करून सगळे निर्णय ते २:१ मध्ये मान्य करावेत आणि पुढे जावे. मात्र, तसे घडलेले नाही. ज्याप्रमाणे बंगालमध्ये एसआयआरमध्ये नावे कापली गेली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील दोन कोटी नावे कापली गेली. संसदेच्या परवानगीशिवाय फाॅर्म सहामध्ये बदल करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संविधान पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्री.आव्हाड यांनी केला.
या आंदोलनात पक्षनेते शानू पठाण, महिलाध्यक्षा मनिषा भगत, युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजीत पवार, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी परिवहन समिती सदस्य शमीम खान, मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षा दिपाली भगत, नगरसेवक यासीन कुरेशी, पल्लवी जगताप आदी सहभागी झाले होते.