जिल्हा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही फोटो: ठाणे वैभव
अधिकृत स्कूल बसच सुरक्षित पर्याय ठाण्यात ६० टक्के स्कूल बसची तपासणी पूर्ण ठाणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूल बसेसची तपासणी सुरू असून आतापर्यंत ६० टक्के बसची तपासणी पूर्ण झाली आहे. विद्यार्थी वाहतुकीची परवानगी केवळ अधिकृत स्कूल बसनाच असून रिक्षा व इतर खासगी वाहनांमधील विद्यार्थी वाहतूक अनधिकृत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावलीनुसार ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्कूल बस तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमांची पूर्तता करणाऱ्या बसेसनाच फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येत असून विद्यार्थी वाहतुकीची परवानगी केवळ अधिकृत स्कूल बसनाच असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. रिक्षा, मिनीबस किंवा खासगी वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक अनधिकृत असल्याने पालकांनी अशा वाहनांचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र धोरण आखले असून त्यानुसार शाळा प्रशासन, बस कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शालेय बसला पिवळा रंग असणे, चालकाकडे किमान पाच वर्षांचा अनुभव आणि बिल्ला असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, रक्तगट, थांबे यांची नोंद वाहनात ठेवणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक बसमध्ये सहाय्यकाची नियुक्ती करणेही आवश्यक करण्यात आले आहे. नियमांनुसार १२ वर्षांपेक्षा अधिक जुन्या बसना शालेय वाहतुकीसाठी परवानगी दिली जात नाही. तसेच प्रत्येक बसमध्ये महिला अटेंडंट असणे आणि वाहनाचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा अधिक नसणे बंधनकारक करण्यात आले आहे. ठाणे परिसरात सुमारे अडीच हजार अधिकृत स्कूल बस असून त्यापैकी ६० टक्के बसची तपासणी पूर्ण झाली आहे. जुन्या मिनीबस, मारुती व्हॅन, रिक्षा अथवा अन्य खासगी वाहनांना विद्यार्थी वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारचा परवाना दिला जात नाही. त्यामुळे अशा वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक पूर्णपणे अनधिकृत मानली जाते. पालकांनी विद्यार्थ्यांना अशा वाहनांमधून शाळेत पाठवू नये, असे निर्देश आरटीओकडून देण्यात आले आहेत. शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत स्कूल बसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रमुख शाळांच्या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक शाळेने परिसरात वाहतूक वॉर्डन नेमावेत, अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीची त्रैमासिक बैठक नुकतीच पार पडली. ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपआयुक्त पंकज शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आणि आशुतोष बारकुल यांनी विविध सुरक्षाविषयक निर्देश दिले. बैठकीत प्रत्येक शालेय वाहनात डॅशकॅम बसविणे, शाळा सुरू होण्यापूर्वी व सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी बस शाळेजवळ उभ्या करणे, चालक व अटेंडंट यांना नियमित रस्ता सुरक्षा प्रशिक्षण देणे, तसेच ब्रेथ ॲनालायझरद्वारे चालकांची दररोज तपासणी करणे अशा उपाययोजनांवर भर देण्यात आला. "विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोलीस, परिवहन विभाग, शाळा व्यवस्थापन, बस मालक आणि चालक यांनी समन्वयाने काम केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त होईल," असे प्रतिपादन उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600