जिल्हा

ठाणे खाडी किनारा प्रकल्पामुळे पुराचा धोका वाढला?

ठाणे खाडी किनारा प्रकल्पामुळे पुराचा धोका वाढला?
ठाणे खाडी किनारा प्रकल्पामुळे पुराचा धोका वाढला? फोटो: ठाणे वैभव
नैसर्गिक नाले अरुंद, अनेक भाग जलमय होण्याची भीती ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारल्या जात असलेल्या महत्त्वाकांक्षी ठाणे खाडी किनारा (कोस्टल रोड) प्रकल्पामुळे परिसरातील नैसर्गिक जलनिचरा व्यवस्था धोक्यात आल्याची बाब समोर आली आहे. तहसील प्रशासनाच्या पाहणीत अनेक नैसर्गिक नाले अरुंद झाल्याचे, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे बंद झाल्याचे आढळून आले आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात कोलशेत, बाळकुम, खारेगाव आणि खाडीलगतच्या अनेक गृहसंकुलांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील बाळकुम ते गायमुख दरम्यान उभारल्या जात असलेल्या खाडी किनारा प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. एमएमआरडीएमार्फत राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी खाडीलगत तात्पुरते कच्चे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या आधारावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती, डेब्रिज आणि रॅबिटची भरणी करण्यात आल्याचे पाहणीत निदर्शनास आले. काही भागांमध्ये कांदळवन क्षेत्रातही भरणी झाल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. खाडीलगतच्या भागातील नैसर्गिक नाले आणि पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गांवर या भरणीचा परिणाम झाला असून अनेक मार्गिका अरुंद झाल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाल्याचे आढळले आहे. परिणामी डोंगराळ भागातून खाडीकडे वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा अडथळ्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तहसील प्रशासनाने खारेगाव खाडी परिसरातील गणेश घाटापासून ते गायमुख खाडी बंदरापर्यंत सर्वेक्षण केले. यावेळी प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या मार्गिकांचा वापर करून अनधिकृत भरणी होत असल्याचेही निदर्शनास आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा-वैतरणा जलवाहिनीलगतच्या रस्त्यांवरूनही अशा भरणीसाठी वाहतूक सुरू असल्याचे आढळले. बाळकुम ते कोलशेत या परिसरात खाडीकिनारी उभारण्यात आलेल्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या परिसरातूनही भरणी साहित्याची वाहतूक होत असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. या भागात सुमारे ५० ते ५५ मोठ्या इमारतींचे प्रकल्प उभारण्यात आले असून त्यांच्या विकासकामांमुळेही नैसर्गिक जलमार्गांवर ताण वाढल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, घोडबंदर रोडलगतच्या खाडी परिसरातील प्रमुख नाल्यांच्या चारही मार्गिका पूर्वी सुमारे ५० फूट रुंद होत्या. मात्र सध्या काही ठिकाणी त्यांची रुंदी केवळ १५ ते २० फुटांपर्यंत मर्यादित झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. भविष्यात अतिवृष्टीच्या काळात या अरुंद नाल्यांमधून पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यास खारेगाव, बाळकुम, कोलशेत तसेच लोढा अमारा, मरिआई नगर आणि दोस्ती वेस्ट काउंटी परिसरात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन जलनिचरा मार्ग पूर्ववत करण्यासाठी आणि अनधिकृत भरणी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600