जिल्हा
३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा विश्वविक्रम करणार
३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा विश्वविक्रम करणार
फोटो: ठाणे वैभव
डोंबिवलीत १५ हजार विद्यार्थी आणि १०० हून अधिक सामाजिक संस्था सहभागी होणार
डोंबिवली : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डोंबिवलीकरांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य तिरंगा रॅलीची माहिती देण्यासाठी श्री गणेश मंदिर येथील विनायक सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून ३५ ते ३६ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा घेऊन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत डोंबिवली व परिसरातील ५० ते ५५ शाळांमधील सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच माजी सैनिक, स्काऊट-गाईड, एनसीसी व एनएसएस कॅडेट, साहित्यिक, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे २५ हजार नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
रॅलीची सुरुवात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारडा सर्कल) येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक परिसरातून होईल. तेथून लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरुरकर पथमार्गे रॅली दत्तनगर चौकाकडे मार्गस्थ होणार आहे. दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे. याच ठिकाणी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
रॅलीच्या मार्गावर देशभक्तीपर गीते, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारीही सहभागी होणार असून, ‘एक तिरंगा, एक देश, एक अभिमान’ या भावनेतून डोंबिवलीच्या सामाजिक एकतेचे आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडविणारा हा सोहळा ठरणार आहे. विशाल तिरंग्याच्या माध्यमातून विश्वविक्रमाची अधिकृत नोंद करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह आमदार राजेश मोरे, राजेश कदम, प्रवीण दुधे, हर्षद पाटील, वृंदा भुस्कुट, दीपाली काळे, पद्मश्री गजानन माने, पुंडलिक पै, शरद गंभीरराव यांच्यासह डोंबिवलीतील विविध संस्था व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475