* ठामपा मुख्यालयात सेनेच्या माजी महापौरांचा ठिय्या
* दफ्तर दिरंगाईविरोधात उपायुक्तांच्या नामफलकाला पुष्पहार
ठाणे: ठाणे महानगरपालिकेतील प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईचा फटका आता थेट लोकप्रतिनिधींनाही बसू लागला आहे. नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासनातील अधिकारी दाद देत नसल्याने ठाण्याचे माजी महापौर तथा शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी बुधवारी महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान वैती यांनी उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेरील अधिकाऱ्यांच्या नामफलकाला पुष्पहार घालून प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
स्व.आनंद दिघे यांच्या प्रेरणेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून गेल्या काही काळापासून ‘जनसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. दर मंगळवार आणि गुरुवारी आनंद आश्रम येथे हा उपक्रम नियमितपणे आयोजित केला जातो. या माध्यमातून ठाणे शहरातील नागरिकांसह ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, नागरिकांच्या तक्रारी सोडविताना महापालिका प्रशासनातील काही अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप वैती यांनी केला आहे. विशेषतः वारसाहक्काच्या आधारे कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या नोकरीचा प्रश्न तसेच संवर्गातील प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. संबंधित प्रकरणातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही केवळ उपायुक्त यांच्या स्वाक्षरीअभावी संबंधित कर्मचाऱ्याचे प्रश्न रखडले आहेत. या प्रश्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर महापालिका उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्याचे अशोक वैती यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
या आंदोलनामुळे महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण आंदोलन करणारे अशोक वैती हे ठाणे महापालिकेचे माजी महापौर असून सत्ताधारी शिवसेनेशी संबंधित आहेत. महापालिकेवरील सत्ता सत्ताधारी पक्षाकडे असतांनाही पक्षाच्या माजी महापौरांना महापालिका उपायुक्ताच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करावे लागते. हे म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी माजी महापौरांनाच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय, असा प्रश्नही या घटनेमुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर तरी प्रशासन समस्या कितपत मार्गी लावते आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत काही बदल होतो का, याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.