उल्हासनगर उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी ११ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली विशेष महासभा अचानक तहकूब व अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. या निर्णयाविरोधात उल्हासनगर पालिकेतील भाजपचे गटनेते राजेश वधारिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला केदार गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. मनिष भाटिया यांनी उल्हासनगर महापालिका, महापालिका आयुक्त, महापौर, नगरसचिव तसेच महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला या संदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ९ सप्टेंबर २०२६ रोजी ही याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती.
स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया आणि विशेष सभा स्थगित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेच्या सुनावणीदरम्यान महापालिकेचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास याचिकाकर्त्यांच्या वतीने अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी मागणी केली जाईल, असा स्पष्ट इशारा वकील मनिष भाटिया यांनी नोटीसीद्वारे दिला आहे.