जिल्हा

दुष्काळात फळांचा भाव चढला

दुष्काळात फळांचा भाव चढला
दुष्काळात फळांचा भाव चढला फोटो: ठाणे वैभव

* १५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ

* सफरचंद, केळी, डाळिंब महागले

नवी मुंबई : जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या दरातील वाढ आणि देशातील विविध भागांत दुष्काळामुळे फळांच्या उत्पादनावर परिणाम होत चालला आहे. त्यामुळे वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळबाजारात फळांची आवक कमी झाल्याने किमती वाढल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध फळांच्या दरांत १५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, डाळिंबाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. दुसरीकडे नवरात्रोत्सवात फळांची मागणी वाढल्याने दरांवर आणखी दबाव येण्याची चिन्हे आहेत.

वाशीच्या एपीएमसी फळबाजारात सध्या सफरचंदांची सर्वाधिक आवक होत आहे. दररोज सुमारे ३५० ते ४०० टन सफरचंद बाजारात दाखल होत असूनही, काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी वाढले आहेत. संत्र्यांची दररोज १०० ते ११५ टन, तर मोसंबीची २६० ते २८० टन आवक होत आहे. या दोन्ही फळांच्या दरांत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केळीचे दरही जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहेत.

डाळिंबाच्या दरांत सर्वाधिक वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. पपईची आवक कमी झाल्याने तिच्याही किमती वाढल्या आहेत.

फळ व्यापारी चिन्मय पानसरे यांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून सिट्रस वर्गातील फळे, मँडरिन आणि अ‍ॅव्होकॅडोची मोठ्या प्रमाणावर आयात होते. न्यूझीलंड आणि वॉशिंग्टन येथून सफरचंदांची आवक सुरू आहे. याशिवाय युरोप आणि ऑस्ट्रेलियातून कीवी, चेरी आणि ब्लूबेरी यांसारखी फळे बाजारात येतात.

कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे आयात होणाऱ्या फळांच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. सध्या इराणमधून सफरचंदांची आवक होत नसून, तुर्कस्तानातून होणारी आयातही कमी झाली आहे. त्यामुळे परदेशी फळांच्या किमती वाढल्या आहेत.

काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील प्रतिकूल हवामानामुळे सफरचंदांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील हवामानातील बदल आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे संत्री, केळी आणि अन्य फळांच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. पपईची आवक कमी असल्याने तिचे दर वाढले आहेत. डाळिंब आणि सीताफळाची आवक महाराष्ट्रातून, तर संत्र्यांची आवक नागपूरसह अन्य राज्यांतून होत आहे.

पुढील काळात हिमाचल प्रदेशातील पावसामुळे सफरचंदांच्या उत्पादनावर आणि महाराष्ट्रातील पाणीटंचाईमुळे अन्य फळांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यास बाजारातील आवक आणखी घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नवरात्रोत्सवात उपवासासाठी फळांना विशेष मागणी असते. या काळात सामान्य दिवसांच्या तुलनेत फळांची मागणी सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढते, असे व्यापारी पानसरे यांनी सांगितले. मात्र, यंदा आधीच फळांचे दर वाढलेले असल्याने मागणीत गेल्या वर्षांसारखी मोठी वाढ होईलच असे नाही. तरीही मागणी वाढल्यास फळांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात उपवासासाठी लागणाऱ्या रताळ्याला बाजारात मोठी मागणी निर्माण झाली आहे. मात्र, यंदा पावसाने मारलेली ओढ आणि प्रतिकूल हवामानामुळे रताळ्याच्या पिकाला फटका बसला असून उत्पादनात घट झाली आहे. आवक कमी झाल्याने बाजारात रताळ्याचे दर गगनाला भिडले असून ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, घाऊक बाजारात २५ ते ३५ रु. किलो विकला जाणारी रताळी किरकोळ बाजारात ६० ते ७० रु. किलो दराने विकली जात आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475