बदलापूर : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार, बदलापूर शहरात १६ ऑक्टोबरपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याबाबत निर्णय घेतला असून, शहरातील विविध भागांत चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा खंडित ठेवला जाणार आहे.
राज्यावर एल-निनोचे सावट असल्याने पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, धरणांमधील उपलब्ध जलसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरावा, यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी पाण्याची किमान १० टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच आदेशाची अंमलबजावणी करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात आठवड्यातून एक दिवस चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
बदलापूर शहराला उल्हास नदीतून पाणी उचलून पाणी पुरवठा केला जातो. आंध्र धरणातून सोडले जाणारे पाणी उल्हास नदीला येऊन मिळते. येथून पाणी सोडणे कमी केल्यास त्याचा उल्हास नदीच्या पाणी पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणी कपात लागू करण्यात आली आहे. एकीकडे बदलापूरमध्ये पाणीकपातीचा निर्णय जाहीर झाला असला तरी, शेजारच्या अंबरनाथ शहराला मात्र यातून तूर्तास वगळण्यात आले आहे. अंबरनाथमध्ये आधीच मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.
अशा परिस्थितीत तिथे १० टक्के पाणीकपात लागू केल्यास नागरिकांचा मोठा रोष ओढवू शकतो, अशी भीती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अंबरनाथकरांना सध्यातरी या पाणीकपातीतून दिलासा मिळाला आहे.