उद्धव ठाकरे यांनी केले पुर्णेकर कुटुंबियांचे सांत्वन
ठाणे : पुर्णेकर कुटुंब एकटे नाही, शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. घटनेच्या मुळापर्यंत जाऊ आणि गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुर्णेकर कुटुंबाला धीर दिला.
शिवसेनेचे मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या निर्घृण हत्येने अवघे ठाणे हादरून गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीसाठी ठाण्यातील मानपाडा गणेशनगरातील निवासस्थानी आले. उद्धव ठाकरे यांना पाहून पुर्णेकर कुटुंबियांच्या अश्रूचा बांध फुटला. या प्रसंगाने उद्धव ठाकरेही हेलावून गेले. त्यांनी पुर्णेकर यांची पत्नी वैजयंती, मुलगा राम, मुलगी निशिता, बंधू जयनाथ यांना धीर दिला. उद्धव ठाकरे यांनी पुर्णेकर हत्या प्रकरणात सुरू असलेल्या पोलीस तपासाबाबत माहिती घेतली. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते राजन विचारे, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे यांच्या दडपशाहीविरोधात माझे बाबा लढत होते. मीनाक्षी शिंदे हिचे जात प्रमाणपत्र बोगस असून त्याची चौकशी करण्याची मागणी माझ्या बाबांनी केली होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीपर्यंत दाद मागितली होती. याचीच तिला भीती असावी म्हणून तिने हे घृणास्पद कृत्य केले असे पुर्णेकर यांचे पुत्र राम याने उद्धव ठाकरे यांना सांगितले. यावेळी राम यांनी प्रदीप यांच्या मारेकऱ्यांचे राजेंद्र शिंदे यांच्यासोबत असलेले फोटोही उद्धव ठाकरे यांना दाखवले.
आम्हाला न्याय पाहिजे. मारेकऱ्यांना सहा महिन्यांची कोठडी मिळेल. नंतर ते सुटतील. त्यामुळे कोठडी नको, त्यांना फासावर लटकवा. माझ्या पतीच्या हत्येचे डाव रचणाऱ्या मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेंना आरोपी करा, त्यांच्यावर एफआयआर दाखल करा, मीनाक्षी शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करा. आम्हाला न्याय द्या असा आक्रोश पुर्णेकर यांच्या पत्नी वैजयंती यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी असे सांगतानाच याप्रकरणात लवकरात लवकर आरोप पत्र दाखल करण्यासाठी पाठपुरावा करू. पुर्णेकर कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले.