सुदैवाने जीवितहानी टळली
अंबरनाथ: येथील बालाजी नगर येथे उभारण्यात आलेली प्रवेशद्वाराची कमान आज दुपारी अचानक कोसळली, या घटनेत जीवितहानी सुदैवाने टळली आहे. मात्र अवघ्या सहा वर्षांपूर्वी उभारलेली कमान कोसळल्याने संताप आणि आश्चर्य व्यक्त होत आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील गावदेवी चौकातून बालाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वार असलेली कमान २०२० साली उभारण्यात आली होती. प्रवेशद्वारावरील कोनशिलेवर त्याची नोंद असून अवघ्या पाच वर्षांतच ते कोसळल्याने पालिकेच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रवेशद्वाराची लोखंडी फ्रेम गंजल्यामुळे संपूर्ण रचना कमकुवत झाली आणि त्यामुळे ती कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.