मुंबई: खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने निश्चित केले आहे.
महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार करून स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर नव्या व्होल्वो आणि शयनयान बसेससाठी मार्ग निश्चित करण्यात येतील.
या आरामबससाठीही प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.
प्रवाशांना केवळ आरामदायी बसच नव्हे, तर हाय-एंड प्रवासी सेवांचा अनुभव मिळावा, यासाठी नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. यामुळे एसटीच्या पारंपरिक प्रवासी सेवेबरोबरच हॉस्पिटॅलिटी आणि ग्राहकसेवेच्या आधुनिक संकल्पनेचा समावेश होणार असून, प्रवाशांना अधिक सुखकर आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.