लेखक व बालवाचक महोत्सव उत्साहात
कल्याण: विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि लेखनकौशल्याला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक व बालवाचक महोत्सव २०२६’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्वरचित कथालेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. रविवारी डोंबिवलीतील टिळकनगर विद्या मंदिर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. डोंबिवली, कल्याण, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, पनवेल, डहाणू, बोरिवली, दादर यांसह जालना, चंद्रपूर, अमरावती, सांगली, अहिल्यानगर आणि नांदेड अशा महाराष्ट्रातील विविध भागांतून तब्बल १,२३५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
इयत्ता चौथी-पाचवी, सहावी-सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पनांना कथारूप देण्याची संधी मिळाल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला आयोजकांकडून रायटिंग पॅड, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शार्पनर तसेच खाऊचा डबा देण्यात आला.
यावेळी जिल्हा उपप्रमुख राजेश कदम, सागर जेधे, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे राजा कामतेकर, महेश नाईक, माधव जोशी, ललिता छेडा, मीना गोडखिंडी, दीपाली काळे, सतीश चाफेकर, अनिल त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.
पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, डॉ. विंदा भुस्कुटे, लीना ओक मॅथ्यू, ज्योती दाते, अमेय घैसास यांच्या स्पर्धा संचालन समितीसह लायब्ररीचे कर्मचारी आणि स्पर्धा पर्यवेक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.