जिल्हा

ठाणे पुरुष संघाची सुवर्णमयी 'हॅट्रिक', महिला संघाला रौप्य!

ठाणे पुरुष संघाची सुवर्णमयी 'हॅट्रिक', महिला संघाला रौप्य!
ठाणे पुरुष संघाची सुवर्णमयी 'हॅट्रिक', महिला संघाला रौप्य! फोटो: ठाणे वैभव

राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 

ठाणे: सातारा येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या राज्य सीनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अमन फारोख संजयच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ठाण्याच्या पुरुष संघाने सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकून विजेतेपदाची शानदार हॅट्रिक साजरी केली, तर महिला संघानेही चमकदार कामगिरी करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

ठाण्याच्या पुरुष संघाने स्पर्धेत सुरुवातीपासूनच प्रभावी खेळ दाखवला. उपउपांत्यपूर्व फेरीत लातूरचा एकतर्फी पराभव केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत नागपूरविरुद्ध ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून ठाण्याने अंतिम फेरीत धडक मारली होती. महामुंबईविरुद्धचा अंतिम सामना अत्यंत थरारक ठरला. पहिल्या एकेरीत सर्वेश यादवने हर्षित माहीमकरचा १५-१०, १५-१२ असा पराभव करत ठाण्याला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कर्णधार अमन फारोख संजयने नाइजील लेरॉय डिसावर १५-०६, १५-०९ अशी सहज मात करत ही आघाडी २-० वर नेली.
तथापि, महामुंबईने पुढील दोन सामन्यांत पुनरागमन केले. पहिल्या दुहेरी सामन्यात विप्लव कुवाळे आणि विराज कुवाळे या जोडीने ठाण्याच्या अर्जुन बिराजदार व आर्यन बिराजदार यांचा १५-०६, १६-१४ असा पराभव केला. त्यानंतर तिसऱ्या एकेरीत अजय मीनाने ठाण्याच्या सानिध्य एकाडेचा १६-१४, १५-०९ असा पराभव केल्याने सामना २-२ असा बरोबरीत आला.

निर्णायक पाचव्या दुहेरीच्या लढतीत अमन फारोख संजय आणि प्रतीक रानडे या जोडीने अप्रतिम खेळ करत महामुंबईच्या जावेद शेख आणि सिद्धेश आरोसकर यांचा १५-१७, १५-०५, १५-१० असा पराभव केला आणि ठाण्याच्या सुवर्णविजयावर शिक्कामोर्तब केले. सुवर्णविजेत्या पुरुष संघात अमन फारोख संजय , सर्वेश यादव, सानिध्य एकाडे, आर्यन बिराजदार, अर्जुन बिराजदार, प्रतीक रानाडे, विनय पाटील, वेदांत जवंजाळ व ओम गवंडी यांचा समावेश होता.

महिला विभागात ठाण्याच्या संघाने उपांत्य फेरीत बलाढ्य पुणे संघाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. रायगडविरुद्धचा अंतिम सामनाही अत्यंत चुरशीचा ठरला. पहिल्या एकेरीत तन्वी घारपुरेला रायगडच्या गाथा सूर्यवंशीकडून ०९-१५, १५-११, ०९-१५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, दुहेरीत सिया सिंग व सोनाली मिरखेलकर या जोडीने गाथा सूर्यवंशी व प्रांजल शिंदे यांचा १२-१५, १५-०७, १५-०८ असा पराभव करत सामना १-१ असा बरोबरीमध्ये आणला.
निर्णायक एकेरीत आर्या कोरगावकरला अनुष्का एपटेकडून १५-११, ०६-१५, ०९-१५ असा पराभव स्वीकरावा लागल्याने ठाण्याच्या महिला संघाला २-१ अशा निसटत्या फरकाने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या संघात अनघा करंदीकर, सोनाली मिरखेलकर, सिया सिंग, आर्या कोरगावकर, तन्वी घारपुरे आणि मृणाल पोद्दार यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475