ठाणे: पुढील वर्षात पाच सुट्ट्या रविवारी आणि सात सुट्ट्या तिसऱ्या शनिवारी आल्याने एकूण सुट्ट्या कमी मिळणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
नूतन वर्ष 2027 मध्ये काय घडणार याविषयाची माहिती देताना श्री.दा.कृ.सोमण म्हणाले की श्रीमहावीर जयंती 18 एप्रिल, स्वातंत्र्य दिन, पारसी न्यू इयर, ईद-ए-मिलाद 15 ऑगस्ट, गुरूनानक जयंती 14 नोव्हेंबर रविवारी येत आहेत. महाशिवरात्र 6 मार्च, महाराष्ट्र दिन 1 मे, श्रीगणेश चतुर्थी 4 सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, विजया दशमी 9 ऑक्टोबर, दिवाळी बलिप्रतिपदा 30 ऑक्टोबर, ख्रिसमस 25 डिसेंबर शनिवारी येत आहेत.
यावर्षी 31 ऑक्टोबर 2026 पासून नूतन वर्षी 24 जानेवारी 2027 आणि 25 जून 2027 पासून 26 नोव्हेंबर 2027 पर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे.
नूतन वर्षं 2027 मध्ये एकूण पाच ग्रहणे हौणार असून दोन सूर्य ग्रहणे आणि तीन छायाकल्प चंद्रग्रहणे होणार आहेत. त्यापैकी 6 फेब्रुवारी 2027चे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. 2 ऑगस्ट 2027 चे खग्रास सूर्यग्रहण भारतातून खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती स्पेन, जिब्राल्टर, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, ईजिप्त सुदान, सौदी अरेबिया, येमेन, सोमालिया येथून दिसणार आहे. या शतकातील जास्त वेळ (6 मिनिटे 23 सेकंद) खग्रास स्थिती दिसणारे हे सूर्यग्रहण आहे. यापूर्वी 22 जुलै 2009 रोजी झालेल्या सूर्यग्रहणात 6 मिनिटे 39 सेकंद खग्रास स्थिती दिसली होती. यानंतर 3 जून 2114 रोजी होणा-या सूर्यग्रहणात 6 मिनिटे 32 सेकंद खग्रास स्थिती दिसणार आहे.
20 फेब्रुवारी,18 जुलै 2027 रोजी होणारी छायाकल्प चंद्रग्रहणे भारतातून दिसणार आहेत. 17 ऑगस्ट रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही.
नूतन वर्षात 22 जानेवारी 2027 रोजी आकाशात सुपरमून दिसणार आहे. 4 मार्च, 30 नोव्हेंबर 2027 रोजी चंद्र-शुक्र युतीचे छानदार दर्शन होणार आहे.
नूतन वर्ष 2027 मध्ये सर्व सण सुमारे 10 दिवस लवकर येणार आहेत. गणपती बाप्पाचे आगमन शनिवार 4 सप्टेंबर 2027 रोजी होणार असून अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी येणार आहे. गणेश चतूर्थीच्याच दिवशी ॠषिपंचमी येत आहे. नूतन वर्षी आश्विन शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी असल्याने भाद्रपद कृष्ण अमावास्येच्याच दिवशी गुरूवार 30 सप्टेंबर 2027 रोजी सकळी 8-05 वाजता अमावास्या संपल्यावर घटस्थापना-नवरात्रारंभ करावयाचे आहे. यापूर्वी 2004 मध्ये असे आले होते. यानंतर 2036 मध्ये असेच येणार आहे.
नवीन वर्ष 2027 हे लीपवर्ष नसल्याने आपल्याला कामाला 365 दिवस मिळणार आहेत.