ज्युनियर बिराजदार बंधूंनी सिनिअर गटात पटकावले सुवर्ण
ठाणे : साताऱ्यात पार पडलेल्या योनेक्स-सनराईज वरिष्ठ गट राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटांमध्ये तीन सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण पाच पदके जिंकून घवघवीत यश संपादन केले आहे.
पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अकॅडमीच्या अर्जुन बिराजदार आणि आर्यन बिराजदार यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. ज्युनियर गटातील खेळाडू असूनही सिनिअर गटात खेळताना त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आणि नागपूरच्या अजिंक्य पाथारकर आणि इयान लोपेज या जोडीचा १९-१७, १५-११ असा पराभव करत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली.
मिश्र दुहेरीत अकॅडमीच्या अमन फारोग संजय आणि अनघा करंदीकर या जोडीने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या जोडीने सलग तीन राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सलग तीन विजेतेपदे मिळवत सुवर्णपदकांची शानदार हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार मुसंडी मारत आदित्य म्हात्रे आणि हेतल विश्वकर्मा यांचा ११-१५, १५-१२, १५-०९ अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अकॅडमीची सिया सिंग आणि पुण्याची रुचा सावंत या जोडीने बाजी मारली. त्यांनी अंतिम सामन्यात अकॅडमीची अनघा करंदीकर आणि नागपूरची नेहल गोसावी या जोडीचा १५-०८, ०५-१५, १५-११ असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. या सामन्यात अनघा करंदीकर व नेहल गोसावी या जोडीला उपविजेतेपदावर (रौप्यपदक) समाधान मानावे लागले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अकॅडमीच्या सर्वेश यादव याने कडवी झुंज दिली. अंतिम लढतीत नाशिकच्या प्रज्वल सोनावणेने सर्वेशचा १७-१५, १६-१४ असा पराभव केल्यामुळे सर्वेश यादव या स्पर्धेत उपविजेता (रौप्यपदक विजेता) ठरला.