जिल्हा

शहापूरमध्ये पावसाच्या खंडाने फुलोऱ्यातील खरीप करपला

शहापूरमध्ये पावसाच्या खंडाने फुलोऱ्यातील खरीप करपला
शहापूरमध्ये पावसाच्या खंडाने फुलोऱ्यातील खरीप करपला फोटो: ठाणे वैभव

१७ हजार हेक्टरवरील वरई, नाचणी, उडीद, खुरसणीसह भातपीक संकटात

शहापूर : पावसाच्या खंडाने ऐन फुलोऱ्यातील खरीप पिकांवर घाला घातला असून, शहापूर तालुक्यातील १७ हजार हेक्टरवरील माळरानावरील वरई, नाचणी, उडीद, खुरसणीसह भातपिके करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

रोडवहाळ, गांडूळवाड, हिंगलुदसह तलवाडा ग्रुप ग्रामपंचायत परिसरातील तसेच तालुक्यातील गाव-पाड्यांमध्ये पिकांची अवस्था गंभीर आहे. उत्पादनाच्या अपेक्षेने उभ्या केलेल्या पिकांनी ऐन काढणीपूर्वीच मान टाकल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीनंतर कृषी विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण सुरू केले आहे.

शहापूर तालुक्यातील बहुतांश माळरानावरील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसात सलग खंड पडल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम या पिकांवर होतो. यंदा वरई, नाचणी, उडीद आणि खुरसणीची पिके फुलोऱ्यात असतांनाच पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आणि पिके करपण्यास सुरुवात झाली असून भातपिकालाही याचा फटका बसला आहे.

शहापूरच्या खरीप शेतीत भाताचे महत्व सर्वाधिक आहे. पीक पेरणी अहवालानुसार तालुक्यात भातासाठी २५,२०९.३२ हेक्टर क्षेत्र अपेक्षित होते. त्यापैकी प्रत्यक्ष २४,८३३.३३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. नाचणीचे अपेक्षित क्षेत्र तब्बल १२,२१४.११ हेक्टर असतांना प्रत्यक्ष लागवड ८२५.०१ हेक्टरवर झाली आहे. वरईची लागवड २४३२.१४ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. तर उडदाचे २८२.१० हेक्टर, तुरीचे ४४६.६३ हेक्टर क्षेत्र असून खुरासणी व तिळाची लागवड तुलनेने कमी आहे. त्यामुळे भाताबरोबरच माळरानावरील वरई, नाचणी आणि कडधान्यांच्या पिकांवरही शेतकऱ्यांची मोठी आर्थिक भिस्त  आहे. तथापी पिकांचे नुकसान झाल्याने यंदाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीचा खर्च, बियाणे-खते, मजुरी आणि कर्जफेड यांचे गणित बिघडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर केवळ पाहणी करून न थांबता नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बुधाजी बरतड यांनी केली आहे.

ग्रुप ग्रामपंचायत तलवाडाच्या सरपंच माया अंकुश बरतड यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने मदत मिळावी, यासाठी कृषी विभागाकडे निवेदन दिले होते. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने तलवाडा परिसरातील गाव-पाड्यांमध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.दरम्यान पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना हवामानाच्या लहरीपणाचा फटका वारंवार बसत आहे. त्यामुळे यंदाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे, वस्तुनिष्ठ सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळते का याकडे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तलवाडा तसेच रोडवहाळ, गांडूळवाड, हिंगलुद आणि परिसरातील माळरानावरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वरी, नाचणी, उडीद, खुरसणीसह भातपिके करपल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बुधाजी बरतड यांनी केली आहे.

तलवाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत नुकसान झालेल्या भागाची आम्ही पाहणी केली आहे. संबंधित पिकांच्या नुकसानीची नोंद घेण्यात आली असून सर्वेक्षणाच्या आधारे आवश्यक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475