आ. संजय केळकर यांचे प्रतिपादन
डोंबिवली : निवृत्त आयपीएस अधिकारी डी.शिवानंदन यांचे आत्मकथनपर 'प्रहार ब्रम्हास्त्रचा' हे पुस्तक काल्पनिक नाही तर प्रत्यक्षदर्शी कथन असून नियत साफ असेल व प्रामाणिकता असेल तर संघटित गुन्हेगारी संपू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे परखड मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.
निवृत्त आयपीएस अधिकारी डी. शिवानंदन यांच्या मुंबईच्या संघटित गुन्हेगारी जगताच्या अंताची कथा सांगणाऱ्या 'प्रहार ब्रम्हास्त्रचा' या मराठी अनुवाद केलेल्या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डोंबिवली येथे झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय केळकर बोलत होते. बी. बी.एन या संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डी. शिवानंदन यांनी लिहीलेले आत्मकथन हे कर्तबगार अधिकाऱ्याला जे अनुभव आले आणि अनुभुती झाली त्याचे काल्पनिक नाही तर प्रत्यक्षदर्शी कथन असून नियत साफ असेल व प्रामाणिकता असेल तर संघटित गुन्हेगारी संपू शकते, हे या पुस्तकाचे मर्म आहे, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद निवृत्त पोलिस अधिकारी श्री. इनामदार यांनी केला आहे. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय जाधव उपस्थित होते. संघटित गुन्हेगारीचे कंबर्डे मोडायला `मकोका' हे जालीम उपाय ठरले, असे डी.शिवानंदन यांनी सांगितले. शासनकर्त्यांनी त्या काळात प्रतिसाद व प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. इंग्रजी पुस्तकाच्या आतापर्यंत 10 हजाराच्या वर प्रती संपल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.