शाळेवर कारवाईचा बडगा
भाईंदर : पर्युषण काळात विद्यार्थ्याच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याचा प्रकार भाईंदर पूर्वेतील तपोवन विद्यालयात उघडकीस आला आहे. शाळेने विद्यार्थ्याकडून २० रुपये दंड (शुल्क) वसूल करून कॅन्टीनमधून दुसरे खाद्यपदार्थ सक्तीने दिल्याची नोंद त्याच्या शेऱ्यात केली.
या मनमानी कारभाराची गंभीर दखल घेत मीरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी तपोवन विद्यालयाकडे तातडीने खुलासा मागितला आहे. २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत खुलासा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते, मात्र बातमी लिहीपर्यंत शाळेकडून कोणताही प्रतिसाद किंवा खुलासा प्राप्त झालेला नाही. दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास शाळेवर कायदेशीर व कठोर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
तपोवन विद्यालयाची नोंद अल्पसंख्याक शाळा म्हणून आहे. शाळेला अंतर्गत व्यवस्थापनासाठी आवश्यकतेनुसार नियम अटी बनविण्याचा अधिकार असला, तरी कोणत्याही विद्यार्थ्याकडून अशा प्रकारे रोख दंड किंवा शुल्क आकारण्याची कायद्यात किंवा नियमावलीत कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. डब्यात काय असावे किंवा नसावे यावरून विद्यार्थ्याला व पालकांना आर्थिक भुर्दंड देणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे.
भाईंदर आणि मीरा रोड परिसरात अशा प्रकारच्या मनमानीचा हा पहिलाच प्रसंग नाही. काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथील 'सेव्हन इलेव्हन' शाळेनेही पर्युषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात विशिष्ट खाद्यपदार्थ न आणण्याबाबत पालकांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवला होता. त्या प्रकरणावरही शिक्षण विभागाने आक्रमक भूमिका घेत कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यानंतर संबंधित शाळेला तो वादग्रस्त संदेश मागे घ्यावा लागला होता. आता तपोवन विद्यालयाच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.