* महिलेसह तिघे जेरबंद
* १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने परिसराची रेकी करून बंद घरं हेरायची आणि रात्री संधी साधून घरफोडी करायची, अशा फिल्मी स्टाईलने गुन्हे करणाऱ्या तिघांच्या टोळीला वागळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून १५२ ग्रॅम सोने, चार किलो १५ ग्रॅम चांदी, दोन लाख ५५ हजार रुपयांची रोकड आणि चार मोबाईल, असा तब्बल १२ लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरती लालन (आरती चौरसिया) यांच्या घरातून १५ लाख ९८,५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा वागळे गुन्हे शाखा समांतर तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळापासून आरोपींच्या हालचालींच्या मार्गापर्यंत तब्बल ८० ते ८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर प्रदीप कमलेशकुमार गौतम (२५), राजकुमार ठाणाराम राजनाथ (२०) आणि दक्षा जितेंद्र मारवाडी (२०) यांना अनुक्रमे भिवंडी, सुरत आणि राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिस चौकशीत आरोपींनी साथीदारांच्या मदतीने ठाणे शहर परिसरात घरफोडीचे सहा गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासातून रबाळे, नारपोली, वागळे इस्टेट आणि राबोडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, यांच्या पथकाने केली. न्यायालयाने आरोपीना पोलिस कोठडी सुनावली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
भिक्षा मागण्याच्या बहाण्याने आरोपी घरांच्या परिसरात फिरायचे. तसेच बंद घरांची पाहणी करून कोणते घर लक्ष्य करायचे, याची रेकी करायचे. घर बंद असल्याची खात्री झाल्यानंतर रात्रीच्या वेळी संधी साधून घरफोडी केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईतून भिक्षा मागण्याच्या आड सुरू असलेला चोरीचा फंडा उघड झाला आहे.