चालकाच्या प्रसंगावधानाने ३० प्रवाशांचे प्राण वाचले
शहापूर : शहापूर तालुक्यातील कोठारे गावाजवळ शहापूर आगाराच्या एसटी बसचा उतारावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील ११ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे शहापूर आगारातील एसटी बसच्या देखभाल- दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र बसचालक अनिल साबळे यांनी प्रसंगावधान राखत बस दरीत जाण्यापासून रोखली.
शहापूर तालुक्यातील कोठारे गावाजवळ शहापूर आगाराच्या एसटी बसचा अपघात झाल्याची घटना सोमवारी घडली. कोठारे येथून ३० प्रवासी घेऊन शहापूरच्या दिशेने निघालेल्या बसचे उतारावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात बसमधील सुमारे ११ प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने त्याला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना मदत केली. दरम्यान शहापूर आगारातील एसटी बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बसचे ब्रेक फेल होण्यासारखी गंभीर घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि बसची तांत्रिक स्थिती याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे.
या अपघातात देऊ पोकळा, करुणा मधे, करण भुतांबरे, हिरा उर्फ वैशाली देसले, मंगळी वीर, धोंडू देसले, शिडू हंबीर, आशा देसले, कमल लखांबरे, भागी पादीर, ज्योती लखांबरे, सपना भगत, फसाबाई देसले, चंद्रकांत जाधव, वैशाली फसाळे, शांता फसाळे आणि कांचन हिंदोळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गाडीचा ताबा सुटल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत अनिल साबळे यांनी बसगाडी उजव्या बाजूला वळविली. त्यामुळे बस संरक्षक भिंतीवर आदळून थांबली. बसगाडी डाव्या बाजूला गेली असती तर ती दरीत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. चालकाच्या या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाचा ताबा सुटल्याचे शहापूर आगार व्यवस्थापक मानसी शेळके यांनी सांगितले. जखमी प्रवाशांना नियमानुसार प्राथमिक आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.