कल्याण : तीन महिन्यांचा पगार थकीत राहिल्याचा तसेच चोरीच्या संशयावरून नोकरीवरून काढून टाकल्याचा राग मनात धरून माजी कर्मचाऱ्याने साथीदारांच्या मदतीने तब्बल ४० लाख रुपयांच्या लुटीचा कट रचल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.
बँकेत पैसे भरण्यासाठी जात असलेल्या दुकानदाराला रस्त्यात अडवून त्याच्याकडील रोकड लुटण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत कल्याण क्राईम ब्रँचने सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३६ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
१५ सप्टेंबर रोजी फारूक अत्तार आणि त्यांचा सहकारी ४० लाख रुपये घेऊन बँक ऑफ बडोदाच्या कल्याण पश्चिम शाखेत पैसे जमा करण्यासाठी जात होते. कल्याण-आग्रा रोडवर दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. दोघांना मारहाण करून आरोपींनी त्यांच्याकडील ४० लाख रुपयांची बॅग हिसकावून पलायन केले. घटनेनंतर बाजारपेठ पोलीस आणि कल्याण क्राईम ब्रँचकडून तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करताना सोहेब शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत समीर शेख याने लुटीचा कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर पोलिसांनी समीर शेख, आफताब खान, शहनवाज अन्सारी, सोहेब शेख, मुजाहिद खान आणि शाहिद शेख या सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील ३६ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. मुख्य आरोपी समीर शेख हा उल्हासनगर येथील क्रांती फूड एजन्सीमध्ये काम करत होता. चोरीच्या संशयावरून त्याला नोकरीवरून काढण्यात आले होते. त्याचबरोबर त्याचा तीन महिन्यांचा पगारही थकीत असल्याचे तपासात समोर आले आहे. नोकरी गेल्याचा आणि पगार न मिळाल्याचा राग मनात धरून त्याने लुटीचा कट आखल्याचे पोलिसांनी सांगितले.
एजन्सीतून किती रक्कम बँकेत जमा करण्यासाठी नेली जाते, ती कोण घेऊन जाते आणि त्यांचा नेहमीचा मार्ग कोणता, याची माहिती समीरला होती. याच माहितीचा वापर करून त्याने साथीदारांच्या मदतीने लुटीचे नियोजन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण क्राईम ब्रँच आणि बाजारपेठ पोलीस करत आहेत.