जिल्हा

राज्यातील पहिल्या प्रीपेड रिक्षाला ठाण्यातून सुरुवात

राज्यातील पहिल्या प्रीपेड रिक्षाला ठाण्यातून सुरुवात
राज्यातील पहिल्या प्रीपेड रिक्षाला ठाण्यातून सुरुवात फोटो: ठाणे वैभव

प्रवासी-रिक्षाचालकांमधील संघर्ष टळणार

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील संघर्ष, रिक्षांच्या रांगा तसेच भाड्याबाबतची अनिश्चितता दूर करून प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ, ठाणे आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचा पहिलाच उपक्रम ठाणे रेल्वे स्थानक येथे साकारण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रीपेड रिक्षा स्टँड व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती सावंत, युनियनचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.

महाराष्ट्रात अशा स्वरूपाची प्रीपेड रिक्षा व्यवस्था यापूर्वी उपलब्ध नसल्याने या उपक्रमाच्या अंमलबजावणीदरम्यान विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. रिक्षाचालक सकाळपासून दिवसभर कष्ट करून मिळवलेले उत्पन्न त्याच दिवशी आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी घरी घेऊन जातो, त्यामुळे त्याच्या दैनंदिन कमाईचा व्यवहार लक्षात घेऊन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात आले. या उपक्रमाला तातडीने मान्यता देऊन ठाणेकर नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी विशेष आभार मानले.

“सकाळपासून दिवसभर केलेल्या व्यवसायाचा संपूर्ण हिशोब संध्याकाळी घरी जाताना रिक्षाचालकाच्या बँक खात्यात जमा होईल. सर्व रिक्षाचालकांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जाणार असल्याने त्यांच्या कुटुंबालाही याचा मोठा फायदा होईल,” असे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी यावेळी सांगत 'सिटी फ्लो'चे आभार मानले. 

प्रीपेड रिक्षा सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वीच निश्चित भाड्याची माहिती मिळणार असल्याने भाड्याबाबतची अनिश्चितता दूर होणार आहे. परिणामी प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यातील भाडे किंवा प्रवासासंदर्भातील संभाव्य संघर्ष टाळण्यास या व्यवस्थेची निश्चितच मदत होणार आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने रिक्षा सेवा मिळणार असल्याने रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी नमूद केले.

या संपूर्ण सेवेचे नियोजन व व्यवस्थापन सिटी फ्लोच्या माध्यमातून करण्यात येणार असून तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून प्रवासी आणि रिक्षाचालक या दोन्ही घटकांना अधिक कार्यक्षम, सुसूत्र आणि पारदर्शक सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475