डोंबिवली : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि नवदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या मंडप बांधणीसाठी हिंदू रितीरिवाजानुसार मांगलिक खांब पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
डी.एन.सी. हायस्कूल, नांदिवली रोड, डोंबिवली पूर्व येथील पटांगणात परम श्रद्धेय आचार्य ह.भ.प. श्री. प्रल्हाद महाराज शास्त्री आणि आमदार तथा डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या हस्ते हा धार्मिक विधी संपन्न झाला. यावेळी महिला जिल्हा संघटक लता पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, विविध पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी, बीएलए, गटप्रमुख आणि शिवदूत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवचंडी याग, नवहोम हवन तसेच सहस्र चंडीयागाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या संख्येने होमकुंड उभारण्यात येणार असून नागरिकांनी या धार्मिक उपक्रमात सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन आमदार राजेश मोरे यांनी केले.
नवरात्रोत्सव हा धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक समन्वय साधणारा उत्सव असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भजन, अभंग आणि संगीताच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, परस्पर समन्वय आणि जीवनमूल्यांचा संदेश देण्यात येणार आहे. घरापासून समाजापर्यंत समन्वयाची भावना दृढ करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मांगलिक खांब पूजनानंतर नवरात्रोत्सवाच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली असून आगामी उत्सवासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.