अंबरनाथ : गणेशोत्सवाच्या जमा झालेल्या वर्गणीत पाच हजारांची तफावत आढळल्याने झालेल्या वादावादीत मित्राने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अंबरनाथ पश्चिमेच्या बालाजीनगर परिसरात रविवारी ही घटना घडली. ओबीएन मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव पार पडला. या गणपती मंडळाच्या वर्गणीतील हिशेबात पाच हजार रुपये कमी कसे झाले? यावरून रविवारी रात्री आरोपी आणि मृत तरुण यांच्यात वाद झाले. मारहाणीत संदीप मढीवाल याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवातील पैशांच्या वादातून आरोपी गोविंद रामलु कोली उर्फ चिन्ना याने केलेल्या मारहाणीत संदीपचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता.
अंबरनाथ पोलीस आणि उल्हासनगर गुन्हे शाखेने पथके तयार करून तपास केला. आरोपी आंध्र प्रदेशकडे रेल्वेने प्रवास करत असताना अवघ्या १२ तासांत त्याच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.