ठाणे: व्हेल माशाच्या पचनसंस्थेत तयार होणारा दुर्मीळ पदार्थ अंबरग्रीस विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो ७२० ग्रॅम वजनाचा अंबरग्रीसचा तुकडा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत तब्बल दोन कोटी ७२ लाख २० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मयुर पाटील (३४) रा. कोल्हापूर आणि मीनाक्षी मोहिते (४६) रा. कणकवली यांचा समावेश आहे. ठाणे बाजारपेठेतील जांभळीनाका परिसरात दोघे अंबरग्रीस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखा, युनिट एकच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री ८ वाजता सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन किलो ७२० ग्रॅम वजनाचा अंबरग्रीसचा तुकडा आढळून आला. त्याची बाजारातील किंमत २ कोटी ७२ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंबरग्रीसचा वापर महागडी सुगधी द्रव्ये, सुगंध टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी किंमत मिळते. या प्रकरणी दोघांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंबरग्रीस त्यांच्याकडे कुठून आले आणि ते कोणाला विक्री करणार होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.