उद्योग

आरटीओ अधिकाऱ्यावर रिक्षाचालकांचा हल्ला

आरटीओ अधिकाऱ्यावर रिक्षाचालकांचा हल्ला
आरटीओ अधिकाऱ्यावर रिक्षाचालकांचा हल्ला फोटो: ठाणे वैभव

नवी मुंबई: मीटरप्रमाणे भाडे आकारण्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) सहायक मोटार वाहन निरीक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार नेरूळमध्ये घडला.

या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या डोळ्याला आणि तोंडाला दुखापत झाली असून, त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक तुषार तानाजी कदम (३३) हे ७ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजता नेरूळ येथील एल.पी. पुलाजवळ आले होते. तेथून उलवे येथील घरी जाण्यासाठी त्यांनी रिक्षा केली. संबंधित रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास नकार देत ३०० रुपये भाडे मागितल्याचे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कदम यांनी मीटरप्रमाणे भाडे देण्याचा आग्रह धरला. तसेच आपण आरटीओ अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले. त्यावरून रिक्षाचालक संतापला आणि शिवीगाळ करू लागला. ‘तू आरटीओमध्ये अधिकारी असशील, ते तुझ्याजवळ ठेव, आम्ही तुला बघून घेतो,’ असे म्हणत त्याने धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पाच-सहा जणांना बोलावले

वाद वाढल्यानंतर रिक्षाचालकाने मोबाईलवरून पाच ते सहा साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर या सर्वांनी कदम यांना घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. ‘नवी मुंबई आरटीओकडून कारवाई होत असल्याचा राग’ आरोपींनी व्यक्त केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

मारहाणीच्या वेळी कदम यांच्या डाव्या डोळ्याला, तोंडाला तसेच शरीरावर दुखापत झाली. झटापटीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. आरोपींनी जीवे मारण्याची तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन कदम यांना पाया पडून माफी मागण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. यातील एका व्यक्तीने या प्रकाराचा मोबाईलवरून व्हिडीओ काढून तो समाजमाध्यमांवर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतर कदम यांनी सहकारी ऋषिकेश खराडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने त्यांनी नेरूळ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी मेमो दिल्यानंतर कदम यांच्यावर प्रथम मीनाताई ठाकरे रुग्णालयात आणि त्यानंतर नवी मुंबई महापालिका रुग्णालय, वाशी येथे उपचार करण्यात आले.

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475