अंबरनाथ: अंबरनाथमधील नेताजी क्रीडांगणाचे बांधकाम पूर्ण झाले असल्यास ते तातडीने खेळाडू आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्या सरावासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून करण्यात आली आहे.
शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांनी नुकतीच नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांची भेट घेऊन नेताजी मैदान खुले करून देण्याच्या मागणीबाबत निवेदन दिले.
शहरातील अनेक धावपटू, विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू तसेच पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होत असल्याचे यावेळी निदर्शनाला आणून देण्यात आले. पोलीस भरतीच्या इच्छुक उमेदवारांना सरावासाठी अन्य शहरांत जावे लागते, यामुळे त्यांना मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागतो. नेताजी मैदानाचे बांधकाम झाले असल्यास ते त्वरित उपलब्ध करून देऊन होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी युवकांतर्फे करण्यात आली.
भाजपा गटनेते अभिजित करंजुले-पाटील, सभापती शैलेश भोईर, नगरसेवक विश्वजित करंजुले-पाटील, राहुल सोमेश्वर आदी यावेळी उपस्थित होते.