कल्याणमध्ये भररस्त्यात थरार
कल्याण : शहरातील वर्दळीच्या आग्रा रोडवर मंगळवारी दिवसाढवळ्या व्यापाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडील तब्बल 40 लाख रुपयांची रोकड लुटल्याने खळबळ उडाली आहे.
दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या वाहनाला दोन अज्ञात तरुणांनी धडक दिली. व्यापारी आणि त्याच्या साथीदाराला खाली पाडल्यानंतर त्यांना मारहाण करून रोकड असलेली बॅग हिसकावण्यात आली. संपूर्ण प्रकार जवळच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, आरोपी भिवंडीच्या दिशेने पसार झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फारूख अख्तर हे कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील तंबाखू व पानमसाला व्यापारी आहेत. मंगळवारी ते आपल्या साथीदारासह दुचाकीवरून 40 लाख रुपयांची रोकड घेऊन आग्रा रोडवरील बँकेत जमा करण्यासाठी निघाले होते. बँकेपासून काही अंतरावर असताना मागून आलेल्या दुचाकीवरील दोन तरुणांनी त्यांच्या ॲक्टिव्हाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे फारूख अख्तर आणि त्यांचा साथीदार रस्त्यावर कोसळले. याच संधीचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी हाणामारी करत रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून भिवंडीच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील दुकानांबाहेर तसेच रस्त्यालगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. वर्दळीच्या परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी लुटीमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.