नवी मुंबई : नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर-१ येथील प्रतीक्षा इमारतीमधील सागर फॅमिली रेस्टॉरंटमध्ये मंगळवारी पहाटे जोरदार स्फोट झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली असून यात दोन जण जखमी झाले आहेत.
सानपाडा येथील सागर फॅमिली रेस्टॉरंटमध्ये विविध खाद्य पदार्थ बनवले जातात. मंगळवारी पहाटे सकाळी सहाच्या सुमारास या ठिकाणी जोरदार स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सदर स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, रेस्टॉरंटच्या आजूबाजूच्या सुमारे सहा दुकानांचे शटर उखडले. तसेच, रेस्टॉरंटच्या समोर असलेल्या रुग्णालयाच्या काचेच्या खिडक्याही फुटल्या असून स्फोटाचा आवाज सुमारे दीड किलोमीटर ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलासह संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.