पत्रकार आणि पोलिसांनी वाचवले प्राण
भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गवरील वर्सोवा पूल येथे दोन चिमुकल्या मुलींसह आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या दाम्पत्याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने चौघांचे प्राण वाचले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.
मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला मध्यरात्री पुलावर दोन लहान मुलांसह दाम्पत्य आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पत्रकार बिनु वर्गीस यांनी दिली. यावरून पोलिसांनी तत्काळ बीट मार्शल क्रमांक ४ चे पोलिस हवालदार कोकरे आणि पोलिस शिपाई मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता रात्री २.१८ वाजता पती-पत्नी आणि दोन मुलींसह आढळून आले. पोलिसांनी चौघांनाही सुरक्षितपणे ताब्यात घेतले. यात २८ वर्षीय तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो मिरा रोड पूर्वेतील शांती पार्क परिसरात कुटुंबासह राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याने बहिणीकडून सोने गहाण ठेवून सुमारे साडेतीन लाख रुपये घेतले होते.
आर्थिक परिस्थिती बिघडल्याने हे सोने सोडवून त्याची विक्री करून रक्कम परत करण्यावरून त्याच्यावर कौटुंबिक दबाव होता. या आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक वादातून त्याने पत्नी व दोन मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही मुली अनुक्रमे दोन आणि एक वर्षांच्या आहेत. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समुपदेशन केले. तसेच तरुणाच्या भाऊ आणि बहिणीला कौटुंबिक वाद मिटविण्याबाबत समज देण्यात आली. मध्यरात्री माहिती मिळाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक हरीश पाटील यांनी दिली.