जिल्हा

पदोन्नतीपाठोपाठ आता रिक्त पदांसाठी होणार भरती?

पदोन्नतीपाठोपाठ आता रिक्त पदांसाठी होणार भरती?
पदोन्नतीपाठोपाठ आता रिक्त पदांसाठी होणार भरती? फोटो: ठाणे वैभव
ठाणे: गेल्या आठवडाभरात ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील तसेच परिवहन आणि शिक्षण विभागातील १५८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्यानंतर आता आस्थापनेवर रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याचे कळते. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचारी गेल्या दोन ते तीन वर्षात मोठ्या संख्येने सेवा निवृत्त झाले आहेत. यामुळे पालिकेत अनेक पदे रिक्त असून या पदांचा अतिरिक्त पदभार इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत. पालिकेत वाढीव पदे मंजुरीचा आकृतीबंध आराखड्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त तसेच आकृतीबंध आराखड्यातील मंजुर पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू होऊ शकलेली नाही. त्याचबरोबर पालिकेत दोन-दोन विभागांचा पदभार सांभाळणाऱ्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नतीही काही कारणास्तव रखडली होती. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. तसेच पदोन्नत्तींबाबत शासनाकडून पालिकेला काही सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले होते. त्यामुळे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या पदोन्नत्ती करणायासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार आस्थापना विभागाने गेल्या दोन दिवसांत १५८ जणांना पदोन्नती दिली असून त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सेवा निवृत्ती तसेच पदोन्नतीमुळे अनेक पदे आता रिक्त झालेली आहेत. या पदांवर आता भरती करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची रिक्त पदे भरण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेच्या नवीन आकृतीबंध आराखड्याला काही वर्षांपुर्वी मंजुरी दिली. त्यातील अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग या अत्यावश्यक सेवातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती राबविण्यासंदर्भात राज्य शासनाने काही आदेश दिले आहेत. त्यानुसार, या विभागांतील रिक्त पदे भरण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दुजोरा दिला आहे. महापालिकेत आजही कार्यकारी ५, उप अभियंता (नागरी) ७, कनिष्ठ अभियंता (नागरी) ७७ आणि कनिष्ठ अभियंता २ अशी ६६ पदे रिक्त आहेत. त्यात मागील महिन्यात शहर विकास विभागातील वरीष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यभार कार्यकारी अभियंत्याच्या खांद्यावर आला आहे. त्यामुले रिक्त असलेली ६६ पदे भरली जाणार आहे तर, आरोग्य सेवेतील महत्वाची पदे मागील काही महिन्यापासून टप्याटप्याने भरली जात आहेत. ठाणे अग्निशमन दलात १८५ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटी स्वरुपातील १२३ असे ३०८ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही अग्निशमनची ४५० पदे मंजुर असतांना केवळ ६८ पदे भरली गेली आहेत. परंतु आता शिल्लक असलेल्या ३८२ अग्निशमन पदाची भरती करण्याचा विचार सुरू असून पहिल्या टप्यात १८० फायरमन कायमस्वरुपी घेतले जाणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475