ठाणे : घोडबंदर भागातील मानपाडा येथिल उबाठाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणी राजेंद्र शिंदे यांची सलग दुसऱ्या दिवशी एसआयटीने चौकशी केली असून या गुन्ह्याच्या तपासाने वेग घेतला आहे.
मागिल महिन्यात कै.पूर्णेकर यांची मानपाडा येथिल त्यांच्या कार्यालयात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे ठाणे हादरून गेले होते. पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, परंतु पूर्णेकर कुटूंबाने माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करून त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. या खुनाचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा देखिल काढण्यात आला होता. अखेर पोलिसांनी काल मंगळवारी राजेंद्र शिंदे यांना चौकशीकरिता बोलावले. त्यावेळी त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी कारण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांना चौकशीकरिता बोलावले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. या चौकशीचा तपशील मिळाला नाही, परंतु पोलिसांनी कसून चौकशी सुरु केल्याने आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.