जिल्हा

कळवा रुग्णालय 'कंत्राटी ऑक्सिजनवर'!

कळवा रुग्णालय 'कंत्राटी ऑक्सिजनवर'!
कळवा रुग्णालय 'कंत्राटी ऑक्सिजनवर'! फोटो: ठाणे वैभव

ठाणे: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा विनाखंड सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

रुग्णालयाची भविष्यातील गरज भागवण्यासाठी पार्किंग प्लाझा येथील कोविड रुग्णालयातील दोन लिक्विड ऑक्सिजन टँक कळवा रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. मात्र, महापालिकेने मागवलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने आणि पीईएसओच्या सुरक्षा परवानग्यांची प्रक्रिया प्रलंबित असल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे नवीन व्यवस्था कार्यान्वित होईपर्यंत सध्याच्याच पुरवठादाराकडून ऑक्सिजन घेण्याकरिता एका वर्षासाठी सुमारे ५९ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

कोविड काळात प्राणवायूची तीव्र गरज निर्माण झाल्यानंतर ठाणे महापालिकेने ग्लोबल कोविड सेंटर आणि पार्किंग प्लाझा येथे ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारले होते. एका प्रकल्पातून २४ तासांत सुमारे १७५ सिलिंडर भरता येतात. दोन्ही प्रकल्पांची एकत्रित ऑक्सिजन निर्मिती क्षमता दिवसाला सुमारे २० टन आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्लोबल आणि  पार्किंग प्लाझा येथील कोविड केंद्र बंद झाले; मात्र पार्किंग प्लाझा येथील ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू ठेवण्यात आला. आता या प्रकल्पांचा उपयोग कळवा रुग्णालयात ऑक्सीजन पुरवठ्यासाठी सुरू आहे. कळवा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी २०१९ मध्ये तीन वर्षांचा कंत्राट करार करण्यात आला होता, ज्याची मुदत संपली आहे. 

कळवा रुग्णालयाचे विस्तारीकरण आणि रुग्णसंख्येत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता भविष्यात ऑक्सिजनची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकल्प रुग्णालयाच्या परिसरात कार्यान्वित झाल्यास ऑक्सिजन पुरवठा अधिक सुलभ होण्याबरोबरच वाहतुकीचा खर्चही कमी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेने माजिवडा येथील पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमधील लिक्विड ऑक्सिजनचे टँक कळवा रुग्णालयात हलवून नवी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी दोनदा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने आता फेरनिविदा प्रक्रिया सुरू आहे.

पार्किंग प्लाझातील टँक कळवा रुग्णालयात बसवून नवीन यंत्रणा कार्यान्वित करणे आणि पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून आवश्यक परवाना प्राप्त करणे यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांची सोय पाहता नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्याच्या 'लिंडे इंडिया लि.' या कंपनीकडूनच मंजूर दराने पुरवठा सुरू ठेवणे आवश्यक बनले आहे.

प्रस्तावातील माहितीनुसार, डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या १२ महिन्यांत कळवा रुग्णालयात ४,९०,२५३ घनमीटर लिक्विड ऑक्सिजन वापरला गेला असून त्यावर ५३ लाख ६४ हजार १९ रुपये खर्च झाले आहेत. भविष्यात रुग्णसंख्येत १० टक्के संभाव्य वाढ गृहीत धरून मार्च २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या एका वर्षाच्या कालावधीसाठी ५९ लाख ४२४ रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच मार्च ते जून २०२६ या कालावधीत केलेल्या पुरवठ्यापोटी १६ लाख २५ हजार रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मान्यता मागण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475