जिल्हा

वाहतूक कोंडीचा फटका; रिक्षातच महिलेची प्रसूती

वाहतूक कोंडीचा फटका; रिक्षातच महिलेची प्रसूती
वाहतूक कोंडीचा फटका; रिक्षातच महिलेची प्रसूती फोटो: ठाणे वैभव

* सुदैवाने माता-बाळ सुखरूप

* नागरिकांचा संताप

उल्हासनगर :  उल्हासनगर शहरात एकीकडे सत्ताधारी पक्षांचे नेते, नगरसेवक व लोकप्रतिनिधी वर्चस्वाच्या राजकारणात आणि एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात दंग असताना शहरातील सामान्य नागरिक मात्र रस्त्यांवरील खड्डे व भीषण वाहतूक कोंडीत अडकून मेटाकुटीस आले आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाला आहे. अशा स्थितीत वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका गर्भवतीची रिक्षातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली.

उल्हासनगरमधील कॅम्प तीन येथील सेक्शन २० या परिसरात राहणाऱ्या हरीकला थापा हिला मंगळवारी अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. प्रकृती खालावू लागल्याने व तातडीने कोणतेही वाहन उपलब्ध न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना एका साध्या रिक्षातून उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयाकडे जात असताना ही रिक्षा न्यू एरा शाळेच्या परिसरात आल्यानंतर वाहतूक कोंडीत अडकली.

या जीवघेण्या वाहतूक कोंडीत ही रिक्षा तब्बल १५ ते २० मिनिटे अडकून पडली होती. रुग्णालयाचे अंतर अवघे काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, कोंडीमुळे रिक्षा पुढे सरकत नव्हती व महिलेच्या प्रसूती कळा वाढत होत्या. अखेर वेळेवर वैद्यकीय मदत न मिळू शकल्याने, रुग्णालयाच्या काही अंतरावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या रिक्षातच हरीकला यांची प्रसूती झाली. या महिलेने रिक्षातच एका मुलाला जन्म दिला. या घटनेत बाळ व बाळंतीण हे दोघेही सुखरूप असून, घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या घटनेमुळे उल्हासनगरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न किती गंभीर बनला आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. उल्हासनगर शहरातील नागरिक दररोज या कोंडीचा सामना करत असून, अनेकदा आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका व इतर वाहनेही या कोंडीत अनेक तास अडकून पडतात. सातत्याने सुरू असलेली कामे, खोदकाम, रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग यावर कारणांमुळे शहरातील कोंडी दिवसेंदिवस वाढते आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475