उल्हासनगर: उल्हासनगर येथे एका ऑर्केस्ट्रा बारवर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकून अश्लील नृत्य आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.४०च्या सुमारास १७ सेक्शन परिसरातील ‘चांदणी बार अँड रेस्टॉरंट’ येथे ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या बारमध्ये कोणत्याही परवान्याशिवाय महिला गायिका आणि नर्तकींकडून रंगीबेरंगी तसेच तोकडे कपडे परिधान करून अश्लील अंगविक्षेप व नृत्य करून घेतले जात होते. ग्राहकांना भुरळ पाडण्याच्या उद्देशाने चाललेल्या या कृत्यातून जमवलेली १०,४०० रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी बार मॅनेजर वीरेंद्र रमेश सिंग (५१), वेटर, बार मालक, ग्राहक आणि महिला गायिका यांच्यासह एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २९६, ५४, ३(५) तसेच महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान कक्ष (बार रूम) मधील अश्लील नृत्यावर बंदी घालणे आणि काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम २०१६ च्या कलम ८(२) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा घटक ४ चे पोलीस शिपाई प्रसाद राजन तांडलीकर यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोबरणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.