पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेवर प्रश्न
ठाणे: बाप्पांच्या विसर्जनातून भाविकांची पसंती स्पष्ट झाली; आता पर्यावरणपूरक व्यवस्थेची दिशा ठरवण्याची वेळ आली आहे. ठाणे पूर्व अष्टविनायक चौकातील कृत्रिम तलावात अवघ्या ८८ मूर्तींचे, तर चेंदणी कोळीवाडा बंदर येथील ठाणे खाडीतील विसर्जन घाटावर ५२५ मूर्तींचे विसर्जन झाले. यामुळे कृत्रिम तलावापेक्षा खाडी, नदी किंवा वाहत्या पाण्याला भाविकांची पसंती असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाविकांची ही पसंती लक्षात घेऊन पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा नव्याने विचार करण्याची गरज आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने केवळ ‘मूर्ती कुठे विसर्जित झाली?’ यापेक्षा ‘विसर्जनानंतर तिचे व्यवस्थापन कसे झाले?’ हे महत्त्वाचे आहे. मूर्ती, रंग व सजावटीच्या साहित्याचा पाण्यावर होणारा परिणाम तपासण्याबरोबरच विसर्जनानंतरच्या अवशेषांचे वैज्ञानिक व्यवस्थापन आवश्यक आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार कृत्रिम तलावात विसर्जित झालेल्या मूर्ती पुन्हा ठाणे खाडीत टाकल्या जात नाहीत. त्यामुळे कृत्रिम तलाव, लोखंडी टाक्या आणि मूर्ती स्वीकृत केंद्रांमधून नोंदवलेल्या २०,७०३ मूर्तींच्या आकडेवारीत ठाणे खाडीतील विसर्जनाचा समावेश आहे की नाही, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. चेंदणी कोळीवाडा बंदर येथील ५२५ मूर्तींचे शाडूमाती आणि पीओपीनुसार वर्गीकरण स्पष्ट नसल्याने, एकूण ९६०० शाडूमाती आणि ११,१०३ पीओपी मूर्तींची संख्या कोणत्या आधारावर ठरवण्यात आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाशी संपर्क साधला असता, संबंधित विसर्जनाची आकडेवारी प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्तांकडून प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
भाविकांना खाडी, नदी किंवा वाहत्या पाण्यात बाप्पांच्या मूर्ती विसर्जित करण्याची पसंती असेल, तर ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने तलावपाळी येथील दत्त घाटाच्या धर्तीवर कायमस्वरूपी आणि वैज्ञानिक विसर्जन घाट उभारण्याचा अभ्यास करावा. त्याचबरोबर कृत्रिम तलावाचाही पर्याय ठेवावा.