ठाणे: राहुल गांधींवरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ ठाण्यात काँग्रेसने ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. ठाणे शहर काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष राहुल कारभारी पिंगळे यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक व्यवस्थेबाबत काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली.
७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इंडिया आघाडीच्या खासदारांवर पोलिसी बळाचा वापर करून दडपशाही केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत ‘रास्ता रोको’ केल्याने परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.