डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’राबविण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत ‘नमो सेवा-अनसुनी कहानियाँ या पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रातील शुभारंभ मुंबईतील केसी महाविद्यालय येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पथनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांचा आणि संयोजकांचा सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील संघर्ष, सेवाभाव, राष्ट्रनिष्ठा आणि जनसेवेचा प्रवास पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी पद्धतीने जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. पिंपरी-चिंचवडमधील कलाकार पथनाट्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग महाराष्ट्राच्या विविध भागांत सादर करणार आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रयोग, तर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान १० पथनाट्य प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत.
‘हनुमान अंश’ या नवोदित कलाकारांच्या चित्रपटाने ज्याप्रमाणे विक्रम केले, त्याचप्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ हे पथनाट्य देखील विक्रम करेल" असा विश्वास यावेळी रविंद्र चव्हाण यांनो व्यक्त केला. या शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष आ. राहुल नार्वेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. अमित गोरखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.