जिल्हा

शीळफाटा वाहतूक कोंडीविरोधात मनसेचे जनआंदोलन

शीळफाटा वाहतूक कोंडीविरोधात मनसेचे जनआंदोलन
शीळफाटा वाहतूक कोंडीविरोधात मनसेचे जनआंदोलन फोटो: ठाणे वैभव

‘जड वाहने अवेळी सोडल्यास गाड्या फोडू, रस्त्यांची डागडुजी न केल्यास टोलनाकाही फोडू’; मनसे आक्रमक


कल्याण : कल्याण-शीळफाटा मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर शाखेच्या वतीने रविवारी  शीळफाटा जंक्शन येथे जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान मनसे नेते राजू पाटील यांनी वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

वाहतूक कोंडीचा प्रश्न न सुटल्यास इशारे देत बसणार नाही, तर थेट रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात मनसेचे  डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद पाटील, मनसे जिल्हा सचिव अरुण जांभळे यांसह परिसरातील नागरिक तसेच मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, महिला सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, 27 गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी  आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

कल्याण-शीळफाटा मार्गावरील मेट्रोचे काम, विविध ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे, अपुरी रस्तेक्षमता आणि अवजड वाहनांची वाढती वर्दळ यामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका नोकरदार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांना बसत असल्याचे मनसेने आंदोलनादरम्यान निदर्शनास आणून दिले. यावेळी बोलताना राजू पाटील म्हणाले की, शीळफाटा रस्त्याची अवस्था ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’सारखी झाली असून, या मार्गावरून वाहने पुढे जाणेही कठीण झाले आहे. या वाहतूक कोंडीला वाहतूक विभाग जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना अनेक वर्षे लागणार असताना, रस्त्यांसाठी आवश्यक असलेली जागा अद्याप ताब्यात आलेली नसताना अशा कामांना वाहतूक विभाग परवानगी देतोच कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना प्रशासनाच्या हातात आहेत. अवजड वाहनांना ठराविक वेळेनुसार आणि टप्प्याटप्प्याने सोडल्यास वाहतूक कोंडी कमी होऊ शकते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. मात्र, यापुढे अवजड वाहने अवेळी सोडल्यास संबंधित गाड्या फोडण्यात येतील, असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला.

विविध यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे सांगत त्यांनी टोल प्रशासनावरही टीका केली. टोल वसूल केला जातो; मात्र रस्त्यांची वेळेत डागडुजी केली जात नाही. रस्त्यांची डागडुजी तीन दिवसांत न केल्यास टोलनाकाही फोडू, असा इशारा त्यांनी दिला.

शीळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करावे आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, भूमिपुत्र आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद पाटील, जिल्हा सचिव अरुण जांभळे, तकदीर काळण, योगेश पाटील, कोमल पाटील, स्वप्ना पाटील, सत्यवान म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे, काळू कोमसकर आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475