जिल्हा

दुष्काळग्रस्त बळीराजासाठी देवीच्या चरणी साकडे

दुष्काळग्रस्त बळीराजासाठी देवीच्या चरणी साकडे
दुष्काळग्रस्त बळीराजासाठी देवीच्या चरणी साकडे फोटो: ठाणे वैभव

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही - उपमुख्यमंत्री शिंदे 

ठाणे : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगत बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या आई दुर्गेश्वरीचा आगमन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आई दुर्गेश्वरीची ढोल, लेझीम, टाळ मृदंग, कोळी नृत्य, गोंधळ नृत्य, आदिवासी तारपा नृत्य आणि इतर पारंपरिक कलाप्रकार सादर करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर देवीचे टेंभी नाका येथील मंडपात विधिवत पूजन करून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ४८ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या नवरात्रोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. कळवा येथून देवीच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. 

राज्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या कठीण परिस्थितीत बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

राज्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना मंडळांना आधीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनेक मंडळांनी उत्सवाचा खर्च कमी करून उर्वरित निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणारे प्रत्येक हात महत्त्वाचे असून सरकारही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली असून केंद्राच्या पथकानेही पाहणी केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मुलींचे ठरलेले विवाह हा देखील गंभीर विषय असून सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी शिवसेनेकडून उचलली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलींसाठी २५ हजार सायकली आणि महिलांसाठी २५ हजार शिलाई मशीन वाटपाचा शुभारंभ परभणीतून करण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

यंदा देवभूमी उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली  आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीच्या या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि ठाणे पोलिसातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेना राज्य संघटनप्रमुख आनंद परांजपे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, कमलेश चव्हाण, निखिल बुडजडे, जॅकी भोईर, स्वानंद पवार, किरण नाकती, बाळा गवस, अमित जयस्वाल आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475