जिल्हा

म्हाडा उभारणार दोन वर्षात एक लाख घरे

म्हाडा उभारणार दोन वर्षात एक लाख घरे
म्हाडा उभारणार दोन वर्षात एक लाख घरे फोटो: ठाणे वैभव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन मुंबई: सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली. यावेळी श्री. शिंदे बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता केंद्र सरकार देशभरात चार राज्यांमध्ये ग्रोथ हब उभारणार आहे. यापैकी एक मुंबई महानगर क्षेत्रात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग, आयटी कंपन्या, सेवा क्षेत्रांचा समावेश असणार आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी वर्ग निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडा तब्बल आठ लाख घरे उभारणार आहे. तसेच योजनाबद्ध गृहनिर्मिती अंतर्गत भाडेतत्वावरील घरे आणि नोकरी करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह देखील उभारले जाणार आहेत, अशी माहिती श्री शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की मुंबई शहराच्या भौगोलिक सीमा लक्षात घेता समूह पुनर्विकासद्वारे ईको-फ्रेडली गृहनिर्मितीवर देखील भर दिला जाणार आहे. तसेच ते म्हणाले की, राज्यातील नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याचा आनंद आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीमध्ये अनामत रकमेसह ७१,६४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडाच्या) पारदर्शक कार्यप्रणालीवर दाखवलेला हा विश्वास आहे. अर्जदारांचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी घरांची गुणवत्ता व सोडतीच्या पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड न करता सोडतीतील विजेत्या अर्जदारांना तात्काळ सदनिकांचा ताबा देण्यात यावा, असे संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी निर्देशित केले. महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे. 'म्हाडा'ने गेल्या दीड वर्षात १३ सोडतींच्या माध्यमातून सुमारे ३० हजार घरे उपलब्ध करून दिली आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत व झोपडपट्टी पुनर्विकास व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. मुंबई पुणे, ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. पुणे येथे देखील समूह पुनर्विकास योजना राबवण्याचे सुतोवाच श्री. शिंदे यांनी केले. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, उपमुख्य अभियंता सुनील ननावरे, अनिल अंकलगी, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, उपमुख्य अधिकारी अतुल खोडे, उपअभियंता मनीषा मोरे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475