ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबियांनी शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केला होता. या प्रकरणात त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबतचे पत्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना देण्यात आले.
ठाणे पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. परंतु पोलिसांच्या तपासावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी या हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार आणि कट रचणाऱ्यांपर्यंत तपास यंत्रणा अद्याप पोहोचलेली नाही, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. पत्रात ठाणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी, अमली पदार्थांच्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासावरही पत्रात गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मारेकरी आणि शिवसेना-शिंदे गटाच्या नगरसेविका तसेच माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यातील संबंध, त्यांचे एकत्रित छायाचित्र तसेच मिनाक्षी शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी प्रदीप पूर्णेकर यांना दिलेली धमकी याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या विरोधात तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.
राजकीय दबावामुळे तपासाची दिशा प्रभावित होत असल्याचा आरोपही मविआच्या नेत्यांनी केला आहे. या मागणीच्या पत्रावर प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर, शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख अनिता गाढवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.