बदलापूर : बदलापूरमध्ये एका ८४ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल पाच कोटी चार लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बदलापूर पूर्व येथील गावदेवी परिसरातील राहणाऱ्या ८४ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.
फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर अनोळखी क्रमांकांवरून सतत फोन आणि व्हिडिओ कॉल्स आले. फोन करणाऱ्या भामट्यांनी आपण नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी जोगळेकर यांना सर्वोच्च न्यायालय, अमंलबजावणी संचालनालय आणि नाशिक इन्फोर्मेशन रिपोर्ट अशी नावे असलेली खोटी कागदपत्रे पाठवली गेली. तसेच, कॅनरा बँकेच्या एका एटीएम कार्डचा फोटो पाठवला ज्यावर फसवणूक झालेल्यांचे नाव होते.
तुमच्या नावाने कॅनरा बँकेत खाते उघडून त्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पैशांची देवाणघेवाण झाल्याचा खोटा दावा या भामट्यांनी केला. या प्रकरणात तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भीती त्यांना आणि त्यांच्या पत्नीच्या मनात निर्माण केली. अटक टाळायची असेल तर तुमची सर्व बँक खाती, बचत रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेकडे स्वाधीन करावे लागतील, असे सांगून या भामट्यांनी त्यांना फोन आणि व्हिडिओ कॉलवर सतत ऑनलाइन ठेवून त्यांच्यावर पाळत ठेवली.
भीतीच्या छायेखाली असलेल्या या जेष्ठ दाम्पत्याकडून या भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यांची सर्व गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने तब्बल ५ कोटी ४ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली.
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी स्वतःला सेंट्रल बोर्ड ऑफ गव्हर्नमेंटचा कायदेशीर सल्लागार असे’ सांगणारा गंजेश कुमार यादव, पोलीस अधिकारी सांगणारा संदीप राव आणि इतर अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे करत आहेत.