जिल्हा

भाजीपाल्यासाठी काळू नदीतून पाणी उपसा

भाजीपाल्यासाठी काळू नदीतून पाणी उपसा
भाजीपाल्यासाठी काळू नदीतून पाणी उपसा फोटो: ठाणे वैभव

भीषण पाणीटंचाईचे संकट

शहापूर: शहापूर तालुक्यात यंदा पावसाने लवकर घेतलेल्या निरोपामुळे शेतीसाठी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील काळू नदीतून भाजीपाला लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा सुरू असून सध्याची नदीतील पाण्याची पातळी पाहता आगामी दोन ते तीन महिन्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजीपाला पिकांसाठी पाण्याचा उपसा सुरूच राहिल्यास शेतीबरोबरच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वेळीच हस्तक्षेप करून पाणी उपशाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

काळू नदीच्या परिसरातील संगम, मानिवली, शिंदीपाडा, गेगाव, नांदवल, अल्याणी, कोळठण, आणि शेलवली आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड केली जाते. दरवर्षी या नदीच्या पाण्यावर अवलंबून राहून शेतकरी भेंडी, काकडी,चवळी, शिरावली, घोसाळी, कारली यांसह विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. यंदाही पाऊस लवकर थांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी नव्याने लागवड करण्याच्या तयारीत आहेत. मात्र एकीकडे लागवडीचे क्षेत्र वाढत असताना दुसरीकडे नदीतील पाण्याची पातळी कमी होत असल्याने आगामी काळात पाण्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजीपाला पिकांना नियमित पाणी देणे आवश्यक असल्याने शेतकरी नदीतून पाण्याचा उपसा करत आहेत. परंतु हा उपसा असाच सुरू राहिल्यास उन्हाळ्यापूर्वीच नदीतील उपलब्ध पाणीसाठा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने पाणी वापराबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर अचानक पाणी उपशावर बंदी घालण्याची वेळ आली तर भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. दुसरीकडे पाणी उपशावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास नदीतील पाणीसाठा कमी होऊन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही निर्णय अचानक लादण्याऐवजी आतापासूनच परिस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. उपलब्ध पाणीसाठा, सुरू असलेली भाजीपाला लागवड, आगामी पाण्याची गरज आणि गावांची पिण्याच्या पाण्याची आवश्यकता यांचा एकत्रित विचार करून प्रशासनाने कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475